मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान कर्नाटकात असणार आहेत. कर्नाटकातून मुंबईत येऊन पंतप्रधान विविध कामांचे उदघाटन करून सभा देखील घेणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली आहे. अशात मुंबईतील एका बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी एमएमआरडीए आणि मुंबई पालिका यंत्रणेने जोरदार तयारी केली आहे. मोदींच्या एक दिवसीय दौऱ्यानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईतील वातावरण मोदीमय झालेले असताना पंतप्रधान मोदींच्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. दक्षिण मुंबईत लावलेल्या या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी बाळासाहेबांसमोर झुकून प्रणाम करताना दिसत आहेत.
शिवसेना आणि भाजप हे एकेकाळी चांगले मित्र असले तरी सध्या या दोन्हही पक्षातील नाते अवघ्या देशाला माहिती आहे. अशात बाळासाहेब आणि मोदींचा जुना फोटो थेट बॅनरवर आल्याने आता राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. हे बॅनर नेमकं कोणी लावले हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पंतप्रधान मोदींचा बाळासाहेबांसमोर झुकलेला फोटो लावल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.