अमरावती – अमरावती शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा निर्णय घेतला. चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार असून या निर्णयाचा शहर पोलीस आयुक्तालयातील 275 महिला पोलीस अंमलदारांना लाभ होणार आहे.
दरम्यान, नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस तिसरे ठरलं आहे.
महिला पोलिसांना बारा तास काम करावे लागते. त्यांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा बारा तासाहूनही अधिक वेळ काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीचा वेळ आता आठ तास केला आहे.