जळगाव – जळगावातील कांचननगर परिसरात 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून झोपलेल्या भावंडांवर फायरींग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या गोळीबारात एकाच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आकाश सपकाळे व सागर सपकाळे असे या दोन भावंडांची नावे आहेत. ते जळगाव शहरातील कांचननगर परिसरात वास्तव्याला आहेत. आज सकाळी साढे आठच्या सुमारास रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून आकाश आणि सागरवर गोळीबार केला आहे.
अचानक घरात शिरलेल्या आरोपींनी आकाश आणि सागर यांची अंगावरील चादर ओढून त्यांच्यावर गावठी बंदुकीतून चार ते पाच गोळ्या झाडल्या आहेत. पण यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्यानं दोघे भाऊ थोडक्यात बचावले आहेत.
या गोळीबारात आकाशच्या हाताला एक गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. तसेच एका हल्लेखोराच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. इतर हल्लेखोरांना गोळीबारानंतर पोबारा केला आहे.