दुबई – फलंदाजांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या येथे सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील सामन्यात सहज विजय मिळवला. या विजयामुळे या स्पर्धेच्या इतिहासात दिल्लीविरुद्ध हैदराबादने राखलेली मक्तेदारीही मोडीत निघाली.
हैदराबादने विजयासाठी दिलेले 135 धावांचे आव्हान दिल्लीने 17.5 षटकांत 2 गडी गमावून 139 धावा करत पूर्ण केले व यंदाच्या स्पर्धेतील आपली यशस्वी आगेकूच कायम राखली. दिल्लीच्या डावाची सुरूवात झाल्यावर सलामीवीर पृथ्वी शॉ लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर शिखऱ धवनने श्रेयस अय्यरसह दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. धवनला अर्धशतक पूर्ण करण्यात मात्र, अपयश आले.
तो 37 चेंडूत 6 चैकार व 1 षटकार फटकावून 42 धावांवर बाद झाला. तो परतल्यावर कर्णधार ऋषभ पंतने अय्यरला सुरेख साथ देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 67 धावांची अखंडीत भागीदारी केली. अय्यरने 41 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावांची तर, पंतने 21 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 35 धावांची खेळी केली. हैदराबादकडून रशिद खान व खलील अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, कागिसो रबाडा, अनरीच नोर्जे व अक्सर पटेल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील लढतीत सनरायझर्स हैदराबादला केवळ 134 धावांवर रोखले. त्यांच्या अब्दुल समद व रशीद खान यांनी दाखवलेल्या जिगरबाज वृत्तीने त्यांना थोडीफार समाधानकारक धावसंख्या उभारली.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी हाराकिरी पत्करली त्यामुळे त्याचा हा निर्णय त्यांनाच नुकसानकारक ठरला. दिल्लीच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 135 धावांवर रोखला गेला.
या स्पर्धेच्या इतिहासात दिल्लीवर कायम वर्चस्व राखलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना या सामन्यात मात्र, दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 2016 सालानंतर प्रथमच सलामीवीर डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर वृद्धिमान साहानेही निराशा केली. त्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि मनिष पांडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर केदार जाधवही तंबूत परतला.
यावेळी त्यांची अवस्था 5 बाद 74 अशी दयनीय झाली होती. जेन होल्डरनेही निरा केली. तळातील फलंदाज अब्दुल समदने फटकेबाजी करत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. त्याला साथ देताना रशिद खानने 19 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावत 22 धावा केल्या. चोरटी धाव घेताना रशिद खान धावबाद झाला तर, अखेरच्या षटकात संदीप शर्माही परतला व त्यांचा डाव 9 बाद 134 धावांवर रोखला गेला. दिल्लीकडून रबाडाने 3 गडी बाद केले. नोर्जे व पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 9 बाद 134 धावा. (अब्दुल समद 28, रशिद खान 22, मनीष पांडे 17, कागिसो रबाडा 3-37, अनरीच नोर्जे 2-12, अक्सर पटेल 2-21). दिल्ली कॅपिटल्स – 17.5 षटकांत 2 बाद 139 धावा. (शिखऱ धवन 42, श्रेयस अय्यर नाबाद 47, ऋषभ पत नाबाद 35, रशिद खान 1-26, खलील अहमद 1-33).