मुंबई – मुंबई क्रिकेट संघटनेने संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी माजी रणजीपटू अमोल मुजुमदारची निवड केली आहे. प्रशिक्षक निवड समितीच्या जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी या तीन सदस्यांनी ही निवड केली.
माजी भारतीय फिरकीपटू साईराज बहुतुले आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. संघटनेने गेल्या आठवड्यात मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. ज्यांनी 50 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तेच या पदासाठी पात्र ठरणार होते. माजी कसोटीपटू वसीम जाफरही मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होता, मात्र मुजुमदारने त्यालाही मागे टाकले.
अमोल मुजुमदारच्या नेतृत्वात मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. निवृत्तीनंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स, दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे. याशिवाय तो समालोचनही करत होता.
1993 ते 2013 साली देशांतर्गत क्रिकेट मोसमात मुजुमदारने अफलातून कामगिरी केली आहे. त्याने 171 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 11 हजार 167 धावा केल्या आहेत.