मुंबई : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याविषयी अद्याप ठोस अशी भूमिका आघाडी म्हणून समोर आलेली नाही. परंतु, दुसरीकडे मविआत यावरून अंतर्गत वाद सुरु झाला असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात टिप्पणी केली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच इशारा दिला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये मिटकरींनी वाचाळवीरांना आवर घालण्यासंदर्भात इशारा दिला आहे. ट्विटमध्ये “आदरणीय उद्धवजी. आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. विनंती ही आहे की आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घालावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटकाळात आपल्यासोबत उभा राहिलाय. गल्लीतल्या टुकार ‘दादाहो’, राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील, तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील”, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार “दादाहो “राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.@uddhavthackeray@AUThackeray
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 21, 2023
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरींनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “महाविकास आघाडीतला मी एक घटक आहे. उद्धव ठाकरे, त्यांचा शिवसेना पक्ष आणि त्यांचं मशाल चिन्ह याबद्दल आमच्या मनात आदर आहे. फक्त मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विनंती केली आहे की कृपा करून ज्या सभा होतील त्यात ज्यांच्याविरुद्ध लढायचं आहे, त्यांच्यावरच तुमच्या लोकांनी बोलावं. राऊत बोलतायत डीएनए चेक करा. आणखी कुणी अजित दादांच्या पहाटेच्या शपथविधीचा व्हिडीओ लावतंय. असं कुणीही उठसूट बोलत असेल, तर शेवटी आम्हालाही मर्यादा आहेत. आम्हालाही पक्षाची संस्कृती आहे. पण शेवटी आम्ही ती किती दिवस पाळायची?” असा प्रश्न अमोल मिटकरींनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.