पुणे – आवळा अनेक आजारावर गुणकारी आहे. त्यामुळे कायम आवळ्याला ग्राहकांकडून मागणी असते. नुकताच आवळ्याचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डात नगर जिल्ह्यातून आवक होत आहे. सध्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात प्रतिकिलोला 20 ते 40 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी माऊली आंबेकर यांनी सोमवारी दिली.
दरवर्षी ऑगस्टमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू होतो. सुमारे डिसेंबरपर्यंत आवक सुरू असते. दोन दिवसांपासून सुमारे 2 ते 4 टनाची आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसांत पुणे आणि सातारा भागातून आवळ्याची आवक सुरू होईल. आवक वाढल्यानंतर रोज 7 ते 8 टनाची आवक होऊ शकते. दरवर्षी संपूर्ण हंगामात आवळ्याच्या प्रतिकिलोला प्रतवारीनुसार 20 ते 30 रुपये भाव मिळाला होता. आवळ्याचा दर्जा चांगला आहे. भावही समाधानकारक मिळत असल्याचेही आंबेकर यांनी सांगितले.
आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, आवळा ज्युस, मोर आवळा, घरगुती लोनच्यासाठी आवळ्याला फळविक्रेते, आवळा उत्पादक कंपन्या आणि ग्राहकांकडून मागणी असते. आवक वाढल्यानंतर मात्र घाऊक बाजारातील भावात काही अंशी घट होऊ शकते. यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्याने आवळ्याच्या झाडांना फळधारणा अधिक झाल्याचे आंबेकर यांनी सांगितले.