बारामती – अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा या त्यांच्या मैत्रीणींसह बारामती दौऱ्यावर विशेष विमानाने आल्या आहेत. बारामती एअरपोर्टवर खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. श्वेता यांच्या समवेत उद्योजक तानिया गोदरेज आणि अन्य त्यांच्या तीन मैत्रिणी आहेत.
बारामतीत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, अधीक्षक डॉ. उदय राजपूत, डॉ. सौरभ मुथा यांनी त्यांना बालरोग विभाग आणि अन्य वैद्यकीय कामकाजातची माहिती दिली.
त्यानंतर श्वेता यांनी एमआयडीसीतील विविध प्रकल्प आणि कंपन्यांसह कृषि विकास प्रतिष्ठानच्या अटल इनक्यूबेशन सेंटरसह विविध प्रकल्पाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून त्यांचे स्वागत केले. यावेळी बारामती टेक्स्टईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या.
सायंकाळी त्यांनी हुरडा पार्टीचा आनंद घेतला. शुक्रवारी रात्री शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी रात्री मुक्कामी थांबल्या. दूसऱ्या दिवशी शनिवारी (दि २८) कृषि विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना श्वेता यांनी खासदार सुळे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे आदींसमवेत त्यांनी भेट देत माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी मुंबई ला रवाना झाल्या. श्वेता या खासदार सुळे यांच्या मैत्रीण आहेत, श्वेता यांचा हा खासगी दौरा असल्याचे समजते.