Entertainment – बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन एका जाहिरातीमुळे वादात सापडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाइन रिटेल पोर्टलसाठी ही जाहिरात केली होती.
अमिताभ बच्चन असलेल्या या जाहिरातीवर स्मार्टफोन विक्रेत्यांनी टीका केली आहे. स्मार्टफोन रिटेलर्सचा आरोप आहे की फ्लिपकार्टच्या ताज्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन असे म्हणताना दिसत आहेत की या सेलमध्ये अशा ऑफर उपलब्ध असतील, ज्या रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध नाही.
ही जाहिरात खरेदीदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप स्मार्टफोन विक्रेत्यांनी केला आहे. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने (एआयएमआरए) या मुद्द्यावर स्मार्टफोन ब्रँड्सना पत्र लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज सेल’च्या प्रमोशनची जाहिरात केली आहे. आता या जाहिरातीचा वाद चांगलाच वाढला आहे.
संघटनेने नाराजी व्यक्त
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने या जाहिरातीवरून बिग बी आणि फ्लिपकार्टवर टीका केली आहे. याबाबत ग्राहक मंत्रालयाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडेही तक्रार करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट ज्या किमतीत मोबाईल देऊ शकते त्या किमतीत ऑफलाइन स्टोअर्सचे व्यापारी मोबाईल देऊ शकत नाहीत, असे जाहिरातीत म्हटले आहे. दिशाभूल करणार्या जाहिरातींना प्रतिबंध करण्याच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांच्या हे नियमांविरुद्ध आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने CCPA ला दंड आकारण्याची विनंती केली आहे.