मुंबई – अभिनेता अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. मध्यंतरी त्यांना कर्करोगासारख्या भयावह आजाराचा सामना करावा लागला होता. मात्र या आजारावर ही त्यांनी यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते एका नव्या उत्साहात आणि जल्लोषात कामाला सुरुवात करणार आहेत. लवकरच ते नाट्यभूमीवर पुनरागमन करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
अतुल परचुरे ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अतुल परचुरे यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत लवकरच नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. या पोस्टला त्यांनी “नाटक USA ला जायच्या आधीचे ४ प्रयोग वेगळ्या संचात. पुढील प्रयोग: 7 ऑक्टोबर शनिवार 4 वा विष्णुदास भावे, वाशी, 8 ऑक्टोबर रविवार 4 वा दीनानाथ, विलेपार्ले, 14 ऑक्टोबर शनिवार 4 वा यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, 15 ऑक्टोबर रविवार 4 वा काशिनाथ घाणेकर, ठाणे,” असे कॅप्शन दिले आहे. यात अतुल परचुरे यांनी त्यांच्या मुंबईत होणाऱ्या प्रयोगांची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
View this post on Instagram
अतुल परचुरे यांच्यासह मुग्धा गोडबोले, सुलेखा तळवलकर, ऋजुता देशमुख, आनंद इंगळे आणि राहुल मेहेंदळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाचं लेखन नीरज शिरवईकर यांनी केले आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकर या नाटकाचे ४ प्रयोग मुंबईत होणार आहेत. दरम्यान, बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला होता.