न्युयॉर्क – जगातील ज्या देशांमध्ये करोनाची लागण झाली आहे, त्यात सर्वाधिक रूग्ण असलेला देश म्हणून अमेरिकेची आज अधिकृतरित्या नोंद झाली. त्या देशात कोरोनाची तब्बल 85 हजार 88 रूग्णांना लागण झाली आहे. 33 कोटी लोकसंख्येच्या या देशाने कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत आता चीनलाही मागे टाकले आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे असे सांगण्यात येत आहे. त्या खालोखाल इटालिचा नंबर लागत असून तेथे कोरोनाचे 80 हजार 539 रूग्ण आढळून आले आहेत. काल एका दिवसात अमेरिकेत तब्बल 16 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आता त्या देशाच्या प्रशासनापुढे आहे. त्यासाठी केली जाणारी उपायोजना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कमी पडत चालली असल्याचे तेथील सध्याचे चित्र आहे. मात्र तेथील प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त चालवली असून कोरोनाग्रस्तांवर तातडीने आणि प्रभावीपणे उपचार सुरू आहेत. दरम्यान अमेरिका हा कोरोनाग्रस्तांचा जगातील एक नंबरचा देश बनला असल्याची बाब अध्यक्ष ट्रम्प यांना मान्य झालेली दिसली नाही.
आज जाहीर आकड्यानुसार अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या चीन पेक्षा जास्त दिसत असली तरी चीन मधील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा अजून कोणालाच माहिती नाही अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका येत्या ईस्टर पर्यंत म्हणजेच 12 एप्रिल पर्यंत करोना निर्बंधातून बाहेर येईल असा विश्वास ट्रम्प यांनी परवाच व्यक्त केला आहे.