बंगाली संस्कृतीशी “जय श्रीराम’चा संबंध नाही – अमर्त्य सेन

कोलकाता- नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ यांनी “जय श्रीराम’च्या घोषणावरुन उठललेल्या वादंगावर भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी “जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत अमर्त्य सेन यांनी “जय श्री राम’चा नारा ही बंगाली संस्कृती नाही, असे म्हटले आहे.

अमर्त्य सेन यांनी जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात संबोधित केले. त्यावेळी अमर्त्य सेन यांनी देशातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले.
अमर्त्य सेन म्हणाले, जय श्रीराम या घोषणेचा बंगालच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी जय श्रीरामचे नारे देण्यात येत आहेत. दुर्गा माता बंगाली नागरिकांच्या जीवनात सर्वत्र आहे. बंगालमध्ये दुर्गेची पूजा होते. जय श्री रामची घोषणा बंगाली संस्कृती नाही. मात्र आजकाल राम नवमी लोकप्रियता मिळवत आहे, असेही सेन यांनी नमूद केले.

मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझा आवडता देव कोणता हे विचारले. त्यावर तिने दुर्गा मातेचे नाव घेतले. त्यामुळे आपल्या आयुष्यात दुर्गामातेचे स्थान आहे. मला वाटतं “जय श्रीराम’चे नारे केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी वापरले जात आहेत, असे अमर्त्य सेन यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत “जय श्रीराम’च्या घोषणेवरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळे भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यापार्श्वभूमीवर सेन यांनी हे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा या विषयाला हवा मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.