सांगली – शुक्रवारी रात्री उशिरा सर्व क्रीडाप्रेमींना एक दुःखद बातमी समजली ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ही बातमी समजल्यानंतर सहाजिकच ट्विटर, फेसबूक, व्हाट्सअप अशा समाजमाध्यमांवर मिल्खा सिंग यांना मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली अर्पण होऊ लागली.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांनी मात्र मिल्खा सिंग यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. आज दिनांक 19 जून 2021 रोजी मैदानाला 47 राऊंड म्हणजे जवळजवळ 19 किलोमीटर अंतर धावून मिल्खा सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यात त्यांना अर्जुन काळे याने साथ दिली.
बापूसाहेब ‘बस नाम ही काफी है’ असं हे व्यक्तिमत्व त्यांचा सहवास अनेकांना हवाहवासा वाटतो. ऊर्जेने ओतप्रोत भरलेलं हे व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणादायी ठरतं. अनेक तरुण आणि अगदी लहान मुलंसुद्धा बापूसाहेबांकडे आदराने आणि कौतूकाने पाहतात, त्यांच्यासोबत व्यायाम करणं ‘अभिमानास्पद’ समजतात.
गेली कित्येक दशकं त्यांच आणि मैदानाच नातं इतकं घट्ट रुजलेलं आहे की कोणीही डोळे झाकून संध्याकाळी 6:00 नंतर बापूसाहेब मैदानावरच भेटतील असे छातीठोकपणे सांगतात. व्यायामाच्या बाबतीत त्यांचा उत्साह वाढत्या वयाबरोबर वाढतंच आहे.
मिल्खा सिंग, मिलिंद सोमण अशी प्रसिद्ध व्यक्तिमत्वे व त्याबरोबरच नियमित व्यायाम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या बाबतीत ते नेहमी भरभरून बोलत असतात. जेव्हा बापूसाहेबांना मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांनी आपल्या या आवडत्या व्यक्तीला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचे ठरविले आणि त्यांनी ते पूर्णही करून दाखविले.
एका (अमर)सिंहाने दुसऱ्या (मिल्खा)सिंहाला वाहिलेली ही अनोखी श्रद्धांजली निश्चितच कौतुकास्पद आहे.