पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर (ता. मुळशी) धरणाच्या भिंतीमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यात यश आले आहे. मागील 4 वर्षांत पहिल्यांदाच टेमघर धरण 100 टक्के भरले असून धरणात 3.71 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गळतीमुळे धरणात 2.75 टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवण्यात येत होता. धरणात मागील वर्षाच्या तुलनेत एक टीएमसी जादा पाणी उपलब्ध झाले आहे.
टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. पाणीसाठा सुरू केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणातून गळती होत आहे. 2016 साली धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले. गळतीचे प्रमाण प्रति सेंकद 2 हजार 587 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. गळतीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास शासनाने मान्यता दिली नव्हती. 2017 मध्ये धरण दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीच्या कामांना यश आल्याने शासनाने यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास परवानगी दिली.
टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नसल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. चांगला पाऊस होऊनही पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागत होता. सोमवारी रात्री 10 वाजता टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. टेमघर धरणातून सुमारे 5 हजार क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे.
2018 मध्ये टेमघर धरण 75 टक्के भरण्यात आले होते. त्यावेळी धरणात 2.75 टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला होता. यावर्षी धरणात 3.71 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दुरुस्तीमुळे धरणात 1 टीएमसी पाणी कमी ठेवण्यात येत होते. आता मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने शहराला 1 टीएमसी जादा पाणी उपलब्ध होणार आहे.
गॅलरीतील गळतीही आटोक्यात येणार
टेमघर धरण गळतीचे प्रमाण सध्या 250 लिटर प्रति सेकंद एवढे असून होणारी गळती गॅलरीमध्ये आहे. धरणाच्या बाहेरील बाजूस गळती आटोक्यात आली असून, येत्या वर्षी शॉटक्रीटचे काम पूर्ण झाल्यावर गॅलरीमधील गळती देखील आटोक्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधहक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.