नाशिक – करोना महामारीमुळे काळ मोठा कठीण आला आहे. रोजच दुःखद बातम्या येत आहेत. ओळखीचे, मित्र परिवारातले, आप्तांचे अचानक सोडून जाणे अस्वस्थ करीत असताना नेमबाज मोनाली गोऱ्हे यांच्या निधनाच्या बातमीने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांच्या वडिलांचेही करोनामुळे निधन झाले आहे.
मोनाली व त्यांच्या वडिलांना काही दिवसापूर्वी केरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. उपचारादरम्यान दरम्यान अचानक त्यांच्या वडिलांची प्रकृती खालावली व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालावली. दुर्दैवी बाब ही की वडिलांनंतर काही तासातच मोनाली यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला आहे. याघटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोनाली ह्या भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा नेमबाज संघाच्या प्रशिक्षक आणि शूटर म्हणून काम पाहिले होते. तर त्यांचे वडिल जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी होते. ते नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरास रहावयास होते.