शिक्रापूर (पुणे) – देशभरात करोनाचे गंभीर संकट उभे आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघात आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उभे आहेत. येथील आरोग्य यंत्रणेची अवस्था असून अडचण व नसून खोळंबा अशी झालेली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबूराव पाचर्णे या आजी-माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्यास झडू लागल्या आहेत.
नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटू लागली असताना, नागरिक आरोग्याबाबत सुविधा मिळण्याची अपेक्षा करत आहेत. आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबूराव पाचर्णे या आजी-माजी आमदारांच्या आरोप प्रत्यारोपात शिरुर तालुक्यातील जनता भरडली जाऊ नये आणि रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत हीच सर्वसामान्य नागरिकांची माफक अपेक्षा आहे.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे म्हणतात…..
सर्वत्र नागरिक करोनाच्या महामारीत अडकलेला असताना दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत रुग्णांना बेड न मिळणे, व्हेंटिलेटर न मिळणे अशा घटना वारंवार समोर येत आहेत. आमदार अशोक पवार यांनी आपला आमदार निधी आरोग्य सुविधांसाठी वापरला असल्याचे ट्विट मे महिन्यात केले होते. यावेळी पवार यांनी या ट्विटमध्ये 13 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त आपल्या आमदार निधीतून व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई कीट वाटप केल्याचा उल्लेख केला होता; परंतु प्रत्यक्षात हे व्हेंटिलेटर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत; मात्र ते व्हेंटिलेटर अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केला आहे. एकीकडे रुग्णांना व्हेंटीलेटर मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे व्हेंटीलेटर असून ते कार्यान्वित केले जात नाही. शिरुर ग्रामीण रुग्णालयात जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या आरोग्य साधनांचा जर जनतेसाठीच उपयोग होत नसेल तर अशा आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराच करायचं तरी काय? असा आरोप पाचर्णे यांनी केला आहे.
आमदार अशोक पवार म्हणतात….
शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हे सर्व आरोप खोडून काढत माझ्यावर भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जे काही आरोप केले आहेत, ते खोटे असून मार्च महिन्यात सरकारने दिलेला 50 लाख रुपये आमदार निधी तालुक्यात कोविड 19 साठी पीपीई किट, मास्क आणि व्हेंटिलेटरवर खर्च केले आहेत. कदाचित व्हेंटिलेटर शासनाला उशीरा मिळाल्याने ते आपल्या ग्रामीण रुग्णालयात उशिरा दाखल झाले असतील; परंतु पुणे जिल्ह्यातील आरोग्यावर खर्च करणारा कदाचित मी एकमेव आमदार असू शकतो, असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. यापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव होत असताना मतदार संघातील 20 हजार कामगारांना बाहेरगावी पाठवायचे होते. त्यावेळी मी प्रशासनाला सोबत घेऊन सर्व कामगारांना बाहेरगावी पाठविण्यास प्रयत्न केले. त्यावेळी माजी आमदार कोठेही दिसले नाहीत, असा टोलादेखील आमदार अशोक पवार यांनी लगावला आहे.