- मात्र नगरसिचवांकडे प्रस्तावच नाही
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा नाना काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर विरोधी पक्षनेता कोण याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र अद्याप नगगरसचिव यांच्याकडे पक्षाने प्रस्ताव पाठविला नाही ही बाबही अधोरेखित झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजप आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंगेस आहे. राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. आतापर्यंत तीन विरोधी पक्षनेते झाले आहेत. तिसरे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ 1 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. करोना संकटामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, असे काटे समर्थकांनी सुचविले होते. मात्र तसे होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाना काटे यांनी राजीनामा दिला.
विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या बैठकीमध्ये नाव नश्चित झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव महापालिका नगरसचिवांकडे देण्यात येतो. तो प्रस्ताव नगरसचिव विभागीय आयुक्तांकडे पाठवितात. विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर महापौर विरोधी पक्षनेत्याचे नाव घोषित करतात.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मिसाळ यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र दुपारपर्यंत नगरसचिवांकडे प्रस्ताव देण्यात आला नाही.
विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप माझ्याकडे प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आठ दिवसांत विभागीय आयुक्तांची मान्यता मिळते. त्यानंतर महापौर नाव घोषित करतील.
– उल्हास जगताप, नगरसचिव