महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
पुणे – पुण्यामध्ये सगळ्या संशयितांच्या चाचण्या होतातच, त्यामुळे त्या कमी झाल्या आहेत असे म्हणता येणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याबाबत आरोग्य विभागामार्फत सूचना दिल्या आहेत. ब्रिटनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नव्या “स्ट्रेन’च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य ठिकाणी चाचण्यांची संख्या कमी केली असली तरी, पुण्यात मात्र त्या कमी केल्या नाहीत.
दिवसाला सरासरी साडेतीन ते चार हजार स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहेत. त्यामुळे चाचण्या कमी केल्या असे झाले नाही. याशिवाय जेवढे संशयित येत आहेत, त्या प्रत्येकाची चाचणी घेतली जात आहे. तसेच कमी लक्षणे असलेल्या नागरिकांतील ज्यांना गृहविलगीकरण करणे शक्य आहे त्यांना ते केले जात आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या पूर्वीइतकीच ठेवली आहे, असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
“आयसीएमआर’ गाइडलाइनप्रमाणे संशयित आणि लक्षणे असणाऱ्यांची योग्य प्रमाणात टेस्ट करण्यात येत आहेच. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाचण्यांमध्ये वाढ अपेक्षित नाही. सुरूवातीपासूनच या गाइडलाइननुसारच चाचण्या केल्या जात आहेत. त्या चाचण्यांची संख्या आधीही कधी कमी केली नव्हती आणि आताही ती कमी केली नाही.
– डॉ. संजीव वावरे, सहआरोग्य प्रमुख, मनपा