मुंबईतील विधानसभेच्या सर्वच जागा जिंकणार

देवेंद्र फडणवीस ः मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार लोढा यांनी स्वीकारला

मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या विधानसभा निवडणूकित शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. पण आता मात्र ही चूक होऊ देणार नाही. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आम्ही मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजेच 36 जागा जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मावळते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मंत्री, आमदार तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंगलप्रभात लोढांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोढा यांच्या कामांची प्रशंसा केली. लोढा आणि त्यांच्या पत्नी समाजकार्यासाठी कायम अग्रणी असतात. त्याचे त्यांनी कधी भांडवलही केलेले नाही, असे सांगतानाच पक्षासाठी देखील त्यांनी कायम झोकून देउन काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी लोढा यांनी घेतली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे भाजपचे 8 नगरसेवक होते तिथे त्यांनी 42 नगरसेवक निवडून आणून दाखविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेली पंचवीस तीस वर्षे मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या सेस, बिगरसेस इमारतीतील रहिवाशांचे प्रश्न त्यांनी तीव्रतेने मांडले असून अशा इमारतींच्या पुनर्विकासाला बंधनकारक करणारा कायदा आम्ही आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रद्रोही शक्‍तींना थारा नाही – लोढा

मुंबईत राष्ट्रद्रोही शक्‍तींना कोणत्याही प्रकारचा थारा मिळणार नाही. बांग्लादेशी नागरिकांना मुंबईच्या मतदारयादीत कोणत्याही प्रकारचे स्थान मिळणार नाही. त्यासाठी मतदारयादीवर आमचे लक्ष राहीलच.त्याचसोबत भाजपाची सदस्यता मोहिम देखील जोमाने राबविण्यात येणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)