ऑक्‍टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल-संजय राऊत

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची युतीही झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला आहे. आमचं ठरलंय असें दोन्ही पक्ष ठामपणे सांगत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ऑक्‍टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे वक्तव्य केले आहे. मनमाड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मागच्या सोमवारीच भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रभारी सरोज पांडे यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्री आमचाच असा दावा करणारी पोस्टर्स नाशिकमध्ये झळकली. यावरुन निर्माण झालेला वाद कुठे शमतो न शमतो तोच संजय राऊत यांनी ऑक्‍टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे म्हटले आहे.

शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंसोबत संजय राऊतही सहभागी झाले आहेत. ही यात्रा मनमाडमध्ये आली तेव्हा तिथली गर्दी पाहून संजय राऊत यांनी आपल्याला विजयी मेळाव्याला आल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले. इतकेच नाही तर जन आशीर्वाद यात्रेला जर इतकी गर्दी झाली आहे तर ऑक्‍टोबर महिन्यात जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल तेव्हा किती गर्दी होईल असेही वक्तव्य त्यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.