बेल्हे -आळे (ता. जुन्नर) येथे पोलिसांनी छापा टाकून अंदाजे 560 किलो गोमांस जप्त केले. तर त्या ठिकाणी असणाऱ्या बांधून ठेवलेल्या आठ जनावरांची सुटका केली.
आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील गावात रविवारी (दि. 31) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आळे गावातील एका व्यक्तीच्या पत्र्याच्या शेडमध्ये गाय, बैल कत्तल करण्यासाठी आणले असून ते एक रात्रीनंतर कापणार असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली.
त्यानंतर ताबडतोब कारवाई करण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी सहकाऱ्यांसह या ठिकाणी जाऊन छापा टाकला या ठिकाणी सहा वासरांना व 2 गायींना कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आल्याचे दिसून आले.
एका पांढऱ्या पोत्यामध्ये अंदाजे 560 किलो गोमांस भरल्याचे ही त्यांना दिसून आले. सुटका केलेल्या जनावरांना भोसरी येथील पांजरपोळ ट्रस्ट या संस्थेच्या गोशाळेत सुखरूप पाठवण्यात आले आहे. पोलीस हवालदार तेजस इस्टे यांनी फिर्याद दिली असून संबंधित दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.