मंच – शिस्तबद्ध पर्यटन हे जुन्नर पर्यटन चळवळीचे बोधवाक्य आहे. मात्र, याच बोधवाक्याला सर्वाधिक धोका पोहोचविणारा घटक दारू असून, संपूर्ण जुन्नर तालुक्यात दारू बंदी करणे शक्य नसले तरी किमान शिवजन्मभूमी जुन्नर शहरात दारूबंदी करून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी मागणी मंचर येथील लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शिवजन्मभूमी म्हणून राज्यात व देशात ओळख असणाऱ्या जुन्नर नगर परिषद हद्दीमध्ये दारू विक्रीची दुकाने, बियर शॉपी, वाईन शॉप व बियरबार वर पूर्णतः बंदी घालण्यात यावी. जुन्नर हे शहर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेले असल्यामुळे किल्ले शिवनेरीप्रमाणेच जुन्नर शहराला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून राज्यात व देशात ओळख आहे.
मात्र, या जुन्नर शहरातच मुख्य रस्त्याला दारूची दुकाने आहेत. किल्ले शिवनेरीला जाण्यासाठी जुन्नरच्या मुख्य वेशीतून जुन्नर शहरात प्रवेश करताच आपले स्वागत दारूच्या दुकानानेच होते. मुख्य चौकापासूनही अगदी हाकेच्या अंतरावर दारूचे दुकान आहे. यामुळे हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या दारूविक्री व्यावसायिकांचा विचार न करता जुन्नर नगर परिषद हद्दीमध्ये पूर्णतः दारू विक्री बंदीचा निर्णय घेण्यात यावा.