पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई तसेच इतर सर्व प्रकारच्या बंदोबस्तासह महापालिकेशी संबंधित गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी राज्य शासनाची स्वतंत्र मान्यता घेऊन तब्बल 152 पोलीस कर्मचारी असलेले स्वतंत्र पोलीस ठाणे महापालिकेस मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या पोलीस ठाण्यात केवळ 50 ते 55 कर्मचारीच नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमधील 50 टक्के कर्मचारी आजारपणाच्या रजेवर असल्याचे समोर आले आहे. परिणामी स्वतंत्र पोलीस ठाणे असूनही महापालिकेस पोलीस आयुक्तांकडे प्रत्येक वेळी बंदोबस्त मागण्याची वेळ आली असून पालिकेचे पोलीस ठाणे केवळ प्रतिनियुक्तीवरील पोलिसांचे पुनर्वसन केंद्र बनल्याची टीका केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत महापालिकेस शहरात अतिक्रमण कारवाई, अनधिकृत बांधकाम कारवाई तसेच इतर सर्व प्रकारच्या कारवायांसाठी शहर पोलिसांकडून स्थानिक पातळीवर बंदोबस्त घ्यावा लागत होता. त्यासाठी वर्षाला दोन ते अडीच कोटींचे शुल्क मोजावे लागत होते. तसेच बंदोबस्तही मर्यादीत आणि वेळेत मिळत नसल्याने महापालिकेस अतिक्रमण कारवाईत अडथळे येत असत, त्यामुळे पालिकेने शासनाकडे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेस पोलीस ठाणे मंजूर होऊन त्याचे कामही सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापही या ठाण्यास मंजूर पदा ऐवढे कर्मचारी मिळालेले नाहीत तर जे नियुक्त करण्यात आले आहेत त्यातील बहुतांश जण आजारपणाच्या रजेवर आहेत.