आळंदी – अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीनिमित्त शनिवारी (दि. 12) तीर्थक्षेत्र आळंदीत एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. एकादशीनिमित्त माऊली मंदिरात गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता भाविकांना इंद्रायणीवरील भक्ती सोपान पुलावरून पान दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात आला तर महाद्वारातून भाविकांना बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आहे. आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रिघ असते. मात्र सध्या अधिक महिना असल्याने आळंदीला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यातच सलग पाच दिवस सुट्ट्या आल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहेत.
आळंदी परिसरात सातत्याने हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र अधिक महिन्यानिमित्त गेली महिनाभर विविध ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून चोहीकडे हरिनामाचा गजर ऐकायला मिळत आहे. अलंकापुरी धार्मिक कार्यक्रमात रंगून गेली असल्याचे चित्र आहे. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सिद्धभेट माऊली मंदिर व इतर ठिकाणी साधक व भाविकांना येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांच्या वतीने अन्नदान महाप्रसाद वाटप केला जात आहे.
एकादशीनिमित राज्यभरातून आलेल्या भाविकांची इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा मार्गावर दिवसभर वर्दळ सुरू होती. गेली महिनाभरापासून आळंदीला दररोज हजारो भाविक भेट देत आहेत. त्यामुळे आळंदीतील व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
एकादशीनिमित्त माऊली मंदिरात धार्मिक कार्यक्रम
पहाटे पवमान अभिषेक, सकाळी 9 ते 12 हरिपाठ आणि गाथाभजन, सायंकाळी 4 ते 5 ह.भ.प. वासकर महाराज यांचे प्रवचन, सायंकाळी 6 :30 ते 8: 30 देहूकरांच्या वतीने कीर्तन, रात्री 10 ते 12 आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने भजन, रात्री 12 नंतर मोझे यांच्यावतीने जागर झाला
.