पुणे – वारीचा आनंद हा केवळ मोठ्या मंडळींपुरताच आहे असे नाही, तर लहानग्यांनीही वारीचा आनंद लुटला. अनेक हौशी पालकांनी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी अशा विविध वेशभूषा करून मुलांना आणले होते. या चिमुकल्यांचा गेटअप हा वारीला साजेसा असल्याने आणि प्रत्येकजण त्यांच्याबरोबर फोटो काढत असल्याने त्यांनीही हा गेटअप एन्जॉय केला. प्रत्येकजण त्यांना उचलून घेऊन, त्यांना जवळ घेऊन आपल्या मोबाइल मध्ये त्यांची छबी स्वत:सोबत टिपत होता. या मुलांनाही आपण “सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन’ असल्याचा आनंद होत होता आणि त्यांनी विविध पोझ सेल्फी काढणाऱ्यांना आणि फोटोग्राफर्सना दिल्या.
पालख्यांवर हेलिकॉप्टरवर पुष्पवृष्टी
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवर संचेती चौकात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. परंतु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी त्यानंतर विलंबाने आल्याने हेलिकॉप्टर उडण्यासाठी वेळेच्या नियमामुळे पुष्पवृष्टी झाली नाही. मात्र पालखीमार्गावर संघटना, संस्था यांच्यातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली.
झाडासाठी धडपड…
ढगाळ वातावरण, थोडासा पावसाचा शिडकावा असे वातावरण वारीच्या वेळी अनुभवायला मिळते. मात्र यंदा कडक उन्ह जाणवत असल्याने हवालदिल झालेल्या वारकऱ्यांनी शहरात प्रवेश केल्यानंतर झाडाचा थंडावा शोधून दाटीवाटीने बसून थोडी उसंत मिळवली. एवढे ऊन असतानाही “ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी।।1।। उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें।।2।। हेच वारकऱ्यांच्या ठायी दिसून येत होते.