आळंदी – आळंदीची कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726व्या संजिवन समाधी सोहळ्याला गुरुवार (दि. 17) पासून सुरुवात होत आहे. रविवार (दि. 20) कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) असून मंगळवारी (दि.22) माऊलींचा समाधी सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता इतर वाहनांना गुरुवार (दि. 17) ते बुधवार (दि. 23) या कालावधीत आळंदी परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहतूक बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग –
पुणे-आळंदी रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मॅग्झिन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून वाहनचालकांनी पुणे-दिघी मॅग्झिन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा. त्याचबरोबर मोशी-देहुफाटा रस्ता बंद असणार आहे. डुडूळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून मोशी-चाकण-शिक्रापुर, मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. चाकण (आळंदी फाटा)-आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हाॅस्पीटल आळंदी फाटा येथे नाकाबंदी करण्यात येणार असून चाकण-मोशी-मॅग्झिन चौक-दिघी -पुणे(पुणे बाजुकडे जाण्यासाठी), चाकण-शिक्रापूर-नगर हायवे पुढे सोलापुर हायवे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. वडगाव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा) – आळंदी रस्त्यावर कोयाळी कमान येथे नाकाबंदी केली जाणार असून वडगाव घेनंद – शेलपिंपळगाव फाटा चाकण-नाशिक हायवे रोडने पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. मरकळ-आळंदी रस्ता (पी.सी.एस. कंपनी धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे, पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खूर्द (पीसीएस कंपनी फाटा) बायपास रोडने चऱ्होली बु. पुणे, मरकळ-कोयाळी वडगाव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण या मार्गाचा वापर करावा. चिंबळी (चिंबळी फाटा) – आळंदी रस्ता (केळगाव बायपास) चिंबळी फाटा येथे नाकाबंदी करण्यात येणार असून वाहनचालकांनी चिंबळी-मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
लोणीकंद मरकळ रोड बंद –
दुरुस्तीच्या कारणास्तव जड वाहतुकीसाठी मरकळ पूल बंद करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला आडवे बार लावण्यात आले आहेत. त्यामुळे आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांची वाहने या रस्त्याने येणे शक्य नाही, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा.