आळंदी : बदलत्या गतिमान जीवनशैलीत लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आई वडिलांविषयी कृतज्ञता सोहळे आवश्यक आहेत, असा विचार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी आपल्या मनोगतातून मांडला.
आळंदी येथील बांधकाम व्यवसायीक व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजीनदार डॉ. दीपक पाटील यांनी आपल्या वडिलांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त समर्थ हॉस्पिटल आळंदी आणि नित्यसेवा हॉस्पिटल धानोरे यांना टाटा मॅजिक ही ॲम्बुलन्स लोकार्पण केली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर महोत्सवानिमित्त महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संकल्पनेनुसार ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे 108 घरी जाऊन पारायण व किर्तन वर्षभरात करायचे आहे. त्यापैकी या सोहळ्यानिमित्त पारायण व कीर्तनाचे 44 वे पुष्प दीपक पाटील यांच्या घरी गुंफले गेले.
याप्रसंगी आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, उत्तमराव गोगावले, दिलीपराव खळदकर, भारत सैनिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप भोसले, श्रीधरजी सरनाईक, आनंदराव मुंगसे, उद्योजक तुकाराम गवारी, प्राचार्य दीपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, कमांडो रघुनाथ सावंत तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच पाटील यांचे मित्रमंडळी, नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कुसुमताई श्रीधर पाटील यांना सौ. कांताबाई वडगावकर यांच्या हस्ते गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आळंदीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे कै. श्रीधर एकनाथ पाटील गुरुजी व श्रीमती कुसुमताई श्रीधर पाटील व कुटुंबीय यांच्या कार्याचा गौरव अजित वडगावकर, राजाभाऊ चोपदार, प्रकाश कुऱ्हाडे, डी.डी. भोसले पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता फिरके यांनी केले तर आभार डॉ. दीपक पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन एस.जी. मुंगसे यांनी केले.