अकोला – जिल्ह्यातील बाळापूर शहरात दुर्दैवी घटना घडली आहे. घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. सतरंजीपुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये एका 9 वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे 4 वाजता घडली आहे.
शेख कुटुंबावर काळाने घात केला असून बाळापूर मधील सतरंजीपुरा भागात राहणारे शेख रसूल आपल्या कुटुंबासमवेत नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास अचानक त्यांचे घर कोसळले. त्यानंतर संपूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
घर कोसळ्याने मोठा आवाज झाला हा आवाज ऐकून साजिद इकबाल अब्दुल रशीद हा शेजारी धावत आला. आजूबाजूचे रहिवासी आणि आपल्या दोन भावांना सोबत घेऊन तो तातडीने घटनास्थळी पोहोचला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले. मात्र यामध्ये एका 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
कुटुंबातील लोकांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेख कामरान असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.