अकलूज – आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या अकलूज शहराला कला, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय वारसा लाभलेले तसेच संस्कार व संस्कृती जपणारे शहर सध्या वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध होताना दिसत आहे. शहरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा व्यवसाय खुलेआम सुरू असून, शहरातील मुख्य चौकात व परिसरात वावरताना नागरिकांची विशेष करून महिलांची कुचंबणा होत आहे.
एकेकाळी अकलूजनजीक असलेली टेंभुर्णी, पंढरपूर, इंदापूर ही गावे वेश्याव्यवसाय अर्थात देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत परिचित होती. मात्र जवळपास वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्वइच्छेने देहविक्री करणे गुन्हा नसल्याचा निकाल दिल्यापासून अकलूज व परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा वावर वाढल्याचे दिसत आहे. अकलूजच्या मुख्य चौकात व परिसरात वर्दळ पाहायला मिळते. येथे असणारी दुकाने व दवाखाने यानिमित्ताने काही महिला परिसरात वावरतात व ग्राहकांना हेरून भर रस्त्याच्या कडेलाच त्यांच्याशी हितगूज करताना दिसतात.
अकलूज परिसरातील काही लॉज व खासगी रूम या महिलांचा अड्डा होताना दिसत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.