इंदापूर – मानवी जीवनात मनाला आनंद फक्त परिणामातून अखंड घेता येतो. यासाठी आयोजित केलेले हरिनाम सप्ताह, ग्रामीण व शहरी भागासाठी वरदान ठरत असल्याचे, गौरवोद्गार इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी काढले.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर रेडा येथे श्री दत्त देवस्थान यांच्या वतीने, दत्त जन्म उत्सवानिमित्त रविवारी (दि. 12) गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताहाच्या पारायणाचे वीणा पूजन, टाळ-मृदंग पूजा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी पाटील बोलत होते. दत्त देवस्थानचे प्रमुख तानाजी गायकवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर, बाजार समितीचे माजी संचालक किरणशेठ बोरा, संचालक सचिन देवकर, रेडा गावचे सरपंच नानासाहेब देवकर, ज्येष्ठ नेते किसनराव देवकर, तुकाराम महाराज काळकुटे, प्रदीपमहाराज पवार, सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे, नरेंद्र भोसले, सतीश राऊत, श्याम इनामे, यांच्यासह अगोती भजनी मंडळ, सर्जेनाथ भजनी मंडळ वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार समितीचे संचालक सचिन देवकर व अंबिका देवकर या उभयतांच्या हस्ते महाभिषेक पार पडला. गुरुचरित्र पूजन व मानाची आरती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत देवस्थानच्या वतीने नीलकंठ मोहिते, रेडा गावचे माजी उपसरपंच बायडाबाई बाबर, सोमनाथ मोहिते, सतीश साठे, औदुंबर खंडागळे यांनी केले. तर सागर शिंदे यांनी आभार मानले.