राजकोट – मधल्या फळीतील आश्वास फलंदाज अंकित बावणे याच्या दमदार शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडचा 4 गडी राखून पराभव केला व आपले आव्हान जीवंत ठेवले.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने नाणेफेक जिंकत प्रथम उत्तराखंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. जगदीश झोपे व मुकेश चौधरी यांनी भेक देलंदाजी केल्यानंतरही उत्तराखंडच्या फलंदाजांनी अडीचशे धावांची मजल मारली.
स्वप्निल सिंग 66 व तनुष गुसेन 55 यांनी अफलातून अर्धशतकी खेळी केली. वैभव भट, रॉबिन बिस्त व हिमांशु बिस्त यांनी उपयुक्त खेळी करत संघाच्या धावसंख्येला हातभार लावला. महाराष्ट्राकडून जगदीश झोपे व मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक 252 धावांचे आव्हान बावणेच्या शतकी खेळीच्या जोरावर 6 गडी गमावुन 1 चेंडू राखून पूर्ण केले व विजय मिळवला. या स्पर्धेत सलग तीन शतकी खेळी करत वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडला या सामन्यात मात्र, अपयश आले. तो केवळ 21 धावा काढून तंबूत परतला.
यश नहार, राहुल त्रिपाठी व अझीम काझी यांनी साफ निराशा केली. एकवेळ महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागणार असे दिसत असतानाच बावणेने एकहाती किल्ला लढवला. त्याला पुरेशी साथ देताना नौशाद शेखने 47 व जगदीश झोपेने 22 धावांची खेळी केली. शेखचे या स्पर्धेत तिसरे अर्धशतक हुकले मात्र, त्याने बावणेला सुरेख साथ देत संघाच्या विजयाच मोलाचा वाटा उचलला.
त्याने बावणेसह पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. बावणेने या स्पर्धेत यंदाच्या मोसमातील पहिले शतक साकार करताना नाबाद 113 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 132 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 1 षटकार फटकावला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने एक चेंडू राखून विजय मिळवताना यंदाच्या स्पर्धेतील आव्हानही कायम राखले. उत्तराखंडकडून स्वप्निल सिंग व हिमांशु बिस्त यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – उत्तराखंड – 50 षटकांत 6 बाद 251 धावा. (स्वप्निल सिंग 66, तनुष गुसेन 55, रॉबिन बिस्त 39, वैभव भट नाबाद 41, हिमांशु बिस्त नाबाद 21, जगदीश झोपे 2-45, मुकेश चौधरी 2-68). महाराष्ट्र – 49.5 षटकांत 6 बाद 252 धावा. (नौशाद शेख 47, जगदीश झोपे 22, अंकित बावणे नाबाद 113, अवधुत दांडेकर नाबाद 1, स्वप्निल सिंग 2-20, हिमांशु बिस्त 2-42).