मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.चित्रपटातील संवादापासून ते व्हीएफएक्सपर्यंत अनेकांवर सर्वसामान्यांनी आक्षेप नोंदवला आहे. आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आदिपुरुषबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आदिपुरुष असेल परपुरुष असेल अशा वादाची कशाला एवढी चर्चा करता असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी पवार यांनी याआधी वाद झालेल्या चित्रपटांबाबत देखील भाष्य केलं. ते म्हणाले, “मागेसुद्धा ‘पठाण’बाबतही असं झालं होत. त्याआधी पद्मावत कि पद्मावती त्या बाबतही असचं झालं होत. मला असं वाटत हे चित्रपट देशपातळीवर चालण्यासाठी हे सगळं केलं जात असावं कारण अशा प्रकारच्या बातम्या आल्यावर लोक अधिक प्रमाणात हा चित्रपट पाहतात. हे त्याच्या मागचं गमक आहे कि काय ? याचा शोध घेतला पाहिजे असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आदिपुरुषवरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
आदिपुरुषबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले,”मागे एक चित्रपट आला होता, त्यातल्या अभिनेत्रीने भगवी बिकनी घातली होती, तेव्हा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हिंदुत्त्वाच्या नावाखाली मोठा हंगामा केला होता. परंतु आता एका चित्रपटात ज्या प्रकारे हिंदुत्वाची नौटंकी आणि तमाशा बनवला आहे, त्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत, हे यांचं ढोंग आहे.यांच्या मते तेव्हा हिंदुत्व धोक्यात होतं मग आता यांचं हिंदुत्व धोक्यात नाही येत का? या चित्रपटात ज्या प्रकारचे संवाद आहेत, जी दृष्यं आहेत त्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, लोकांमध्ये त्याबद्दल रोष आहे. त्यामुळे यावर कारवाईसाठी तुमच्याकडे कोणताही कायदा नाही का? हे लोक रामाच्या नावाखाली ढोंग दाखवत आहेत. यांचं रामायणच नकली आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.