Ajit Pawar – कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी काल भेट दिली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असताना आता स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी जाहीर केली आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,
“अत्यंत चुकीची घटना आहे. हे असं घडू नये. मी भेट झाल्यावर पार्थला सांगेन. माझ्याकडून अशीच एकदा चूक घडली होती. त्यावेळी मी संबंधित व्यक्तीला तात्काळ पक्षातून काढून टाकलं होतं”. असं पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला आहे. शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरुड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. गज्या मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.