सातारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेल्या अभ्यांगताना पिण्याचे पाणी न मिळाल्याने अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्किट हाऊसला येताना मी पीएकडे ५० हजार रुपये देत असतो. त्यामुळे आम्ही काही फुकट चहा, पाणी मागत नाही. अभ्यांगतांना पाणी न देणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर मी कारवा करेन, असा सज्जड इशारा ना. अजित पवार यांनी देत आपला संताप व्यक्त केला.
अजित पवार यांना भेटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सातारच्या शासकीय विश्रामगृहात गर्दी केली होती. सुमारे चार तास अजित पवार याठिकाणी थांबले होते. यादरम्यान अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यांगताना तेथील यंत्रणेकडून पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. याबाबत अभ्यांगतांमध्ये कुजबूज सुरु होती. यादरम्यान अजित पवार अभ्यांगताना भेटण्यासाठी बाहेर आले असता काही अभ्यांगतांनी पाणी मिळाले नसल्याबाबत तक्रार केली.
यावेळी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याठिकाणची यंत्रणा आजच्या आज बदला अन्यथा मला तुम्हाला बदलावे लागेल, असा इशारा दिला. येथील यंत्रणेचा मलाही वाईट अनुभव येत आहे. मीही काही गोष्टी बघत आहे. वास्तविक याठिकाणी येणाऱ्यांना पिण्याचे पाणी दिले म्हणून काय बिघडले. आम्ही चहा आणि पाणी काही फुकट मागत नाही. सर्किट हाऊसला येताना मी पीए कडे पन्नास हजार रुपये देत असतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
नव्या सर्किट हाऊसबाबत केल्या सूचना
शासकीय विश्रामगृहाशेजारी नवे विश्रामगृह बांधण्यात येत असून या कामाचा आढावा अजित पवार यांनी अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्याकडून घेतला. फेब्रुवारीअखेर हे काम पूर्ण होईल, अशी माहिती श्री. रोकडे यांनी दिली. या कामाबाबतही अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. आकर्षक आणि दर्जेदार काम व्हावे यासाठी बारीक लक्ष ठेवून काम करुन घ्या, असेही अजित पवार यांनी सांगितले.