तमिळमधील “कैथी’या गाजलेल्या थ्रिलरचा हिंदी रिमेक करणार असल्याची घोषणा अजय देवगणने केली आहे. अजय या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार असल्याचा अंदाज खूप पूर्वीपासून वर्तवला जात होता. ट्विटरवरच्या पोस्टमध्ये अजयने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्याचा हा “कैथी’चा हिंदी रिमेक पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
या सिनेमात तो लीड रोल साकारणार आहेच. त्याशिवाय रिलायन्स एन्टरटेनमेंट आणि ड्रीम वॉरिअर पिक्चर्सबरोबर मिळून तो या सिनेमाच्या प्रॉडक्शनचीही जबाबदारी सांभाळणार आहे. गुन्ह्यात दोषी ठरलेल्या एका गुन्हेगाराशी संबंधित ही कथा आहे. तुरुंगातून सुटल्यावर आपल्या कन्येला भेटण्यासाठी तो उत्सुक असतो. मात्र एका ड्रग रॅकेटमध्ये त्याला पद्धतशीरपणे अडकवले जाते.
अजय आणि काजोल हे दोघे पती-पत्नी यापूर्वी “तान्हाजी’मध्ये एकत्र दिसले होते. त्यांची जोडी आणि हा सिनेमा दोन्हीला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. “तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ने आतापर्यंत 200 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. अजूनही देशात काही ठिकाणी “तानाजी’ सुपरफास्ट सुरू आहेच. आता लवकरच “कैथी’ची बाकीची स्टारकास्ट घोषित होईल.