महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; युनिक कोड, वॉटर मार्क, लोगोसह क्यूआर कोड असणार वैशिष्ट्य
नगर (प्रतिनिधी) – जवळपास आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून, आता सात-बारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. त्यातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात-बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड, हे सात-बाराचे वैशिष्ट्य ठरेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
थोरात म्हणाले, “”राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात एम. जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये 1941 मध्ये एम. जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत आहे. सात-बारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
गाव नमुना नंबर सातमध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (लोकल गर्व्हनमेंट डिरेक्टरी) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहे. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही. मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सात-बारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.