संगमनेर – लाळ खुरकूत व लंपी स्किन डेसिज या आजाराचा संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांना आपल्या जनावरांना आजाराची लक्षणे दिसताच संपर्क करून उपचार करून घ्यावे. लहान-मोठ्या सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन महानंद व संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले.
राजहंस दूध संघ व पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाळ खरकूत व लंपी स्किन डेसिज आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, भाऊसाहेब कुटे, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, संपतराव डोंगरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, डॉ.संतोष वाकचौरे, डॉ. अजय थोरात, डॉ. जालिंदर तिटमे, डॉ. संजय थोरात, डॉ. भोर, डॉ. जोधळे डॉ. वर्षा शिंदे, डॉ. गबाले, डॉ. पानसरे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे व राजहंस दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित खिल्लारी व तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक तसेच दूध संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, लाळ खरकुत व लंपी स्किन डेसिज हे संसर्गजन्य आजार असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लाळ खरकूत व लंपी आजाराचे लक्षणे दिसताच जवळच्या सरकारी पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे अथवा राजहंस दूध संघाच्या स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांच्याकडे संपर्क करून तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे. संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसाय व्यापक स्वरूपाचा आहे. परंतु, त्या प्रमाणात सरकारी पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यक यांची संख्या कमी प्रमाणात आहे.
ती वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर चर्चा केली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संगमनेर तालुक्याच्या पशुधनाच्या तुलनेत पशुधन पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्याची विनंती केली आहे. लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल परंतु जवळ आलेल्या संकटातून सर्वांनी मिळून मार्ग काढला तर दुग्ध व्यवसायातील उत्पादन खर्च कमी होईल. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजहंस मेडिकलमध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध केलेले आहे. यावेळी डॉ. प्रशांत पोखरकर व डॉ. सुजित खिलारी यांनी मार्गदर्शन केले.