अहमदनगर : अवैधरित्या बायोडीझेलची विक्री करणारी टोळी जेरबंद

संगमनेर शहर पोलिसांची कारवाई; अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर  – एकीकडे इंधन दरवाढीचा दररोज नवा विक्रम प्रस्थापित होत असताना दुसरीकडे स्वस्त इंधनाच्या शोधात असणाऱ्या नागरिकांना पर्यायी वापराचे बायोडिझेल मिळत आहे. परंतु, खरेदी-विक्रीचा शासनाचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू असलेल्या शहरातील मालदाड रस्ता परिसरातील एका ठिकाणावर शहर पोलिसांनी सोमवारी (ता. 18) दुपारी बारा वाजेच्या सुमारास छापा टाकून बायोडिझेलसह विविध वाहने असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल रमेश रासकर, मोहम्मद यासीन वाहिद हुसेन (रा.उत्तराखंड), सुनील मारुती पावसे, संदीप मारुती पावसे, अण्णासाहेब जाधव (रा. हिवरगाव पावसा) व गणेश गणेश दादासाहेब सोनवणे (रा. वेल्हाळे), संजय पगडाल (रा.संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरातील तिरंगा चौकालगत बेकायदेशीररित्या बायोडीझेल सदृश्‍य ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली.

त्यांनी ही माहिती हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांना कळविली. पोलीस व पुरवठा विभागाच्या पथकाने काल दुपारी बारा वाजता छापा घातला असता दत्तनगर परिसरातील शंकर उपाध्याय यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये त्यांना वेगवेगळी वाहने संशयास्पदरीत्या उभी दिसली. चौकशी केली असता बायोडीझेलची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली.पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली. त्यावेळी राहुल रमेश रासकर (वय 27, रा.पावबाकी रस्ता) याला थांबविले असता आपण पिकअप चालक असल्याचे त्याने सांगितले.

याठिकाणी आणखी पाचजण उभे होते. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बायोडीझेल बेकायदेशीररित्या भरले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी याठिकाणाहून तीन लाख दहा हजार रुपये किंमतीची पिकअप जीप (क्रमांक एमएच. 40, डीएस 7440), 1 लाख 72 हजार रुपये किंमतीच्या दोन टाक्‍या व फिल्टर मशीन,

6 लाख 25 हजार रुपये किंमतीचे आयशर वाहन (क्रमांक एमएच.17, बीवाय. 5245) असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम 285, 34, जीवनावश्‍यक वस्तू कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.