मालेगाव – राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सध्या मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. शेती विषयक वैठका – परिस्थिती जाणून घेत आहेत. एका नियोजित कार्यक्रमात सेवाभावी संस्थेतर्फे 23 गोरगरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यानिमित्ताने पारंपारिक मांडव कार्यक्रमात मिरवणुकीत काढण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान दादा भुसेंनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत सगळ्यांसोबत नृत्य केले आणि चर्चेत आले. आज मात्र त्यांनी आज धडक कारवाई करत तालुक्यात वचक बसविला. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. याउलट पोलीस दलात आदरयुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मंत्री येतील आणि कोठे धाड टळतील हे सांगता येत नाही , अशी दलात चर्चा सुरू आहे.
मालेगाव तालुक्यातील झोडगे गावात दोन महिन्यांपासून एका मटका-जुगार अड्ड्याने चांगलाच जम बसवत अनेकांची आर्थिक पिळवणूक केली. याबाबत ग्रामीण दौर्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना माहिती मिळाली असता, त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी चर्चा करित विशेष पोलिस पथकासह ‘त्या’ ठिकाणी छापेमारी करित अड्डा उद्ध्वस्त केला.
कृषिमंत्र्यांनी याप्रश्नी वेळ न दवडता अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना सूचना दिली. ते विशेष पथकासह झोडगेत दाखल झाले. क्लबमधील कारभार उघड झाल्याने त्याचा शेड उद्ध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून, चौधरी नामक व्यक्तीचा हा क्लब असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकच नव्हे तर पोलिस विभागातही खळबळ उडाली आहे.
आज दोन वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. साधारण दोन महिन्यांपूर्वी हा क्लब सुरु झाला होता. अल्पावधीत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषाने अनेक युवक या गैरमार्गाला लागलेत. परिणामी, कौटुंबिक कलहही वाढलेत. या अवैध धंद्याने संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित झाला.