मुंबई – प्रभादेवी येथे शिवसेना-शिंदे गट मध्यरात्री आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. या प्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.
यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तर महेश सावंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन संतोष तेलवणे यांना मारहाण केली. या कार्यकर्त्यांनी 20 ते 25 कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह संतोष तेलवणे यांना मारहाण केली, असा आरोप संतोष यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.