पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मिशन बारामती म्हणून आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बारामतीवर लक्ष्य केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश करण्यात आला.
आगामी लोकसभेची निवडणूक अडीच वर्षानंतर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मावळ, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला मात्र शहरी भागाशी संलग्न असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार खडकवासला, वारजे, नऱ्हे-आंबेगाव भागातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.
छावा संघटनेचे आप्पा आखाडे, नऱ्हे-आंबेगाव परिसरातील समीर कुटे, भोर तालुक्यातील केळवडे गावातील रोहित वाल्हेकर, वारजे परिसरातील संदीप तांगुदे यांनी मनसेत प्रवेश केला. हे सर्व कार्यकर्ते ताकदीचे असून त्याचा बारामती लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला निश्चित फायदा होईल, असा दावा वसंत मोरे यांनी केला. दरम्यान, मनसे सरचिटणीस हेमंत संभूस यांची महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या राज्य अध्यक्षपदी आणि संतोस दासवडकर यांची भोर-वेल्हा-मुळशी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.