नवी दिल्ली – बऱ्याच बैठकांनंतर अखेर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर शिवकुमार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. 20 मे रोजी बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. मात्र, राज्याचा पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसला चार दिवस लागले. खरे तर काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवण्याचे ठरवले होते, परंतु शिवकुमार हे देखील इच्छुक असल्याने काँग्रेसला निर्णय घेण्यात उशीर लागल्याचे बोलले जात आहे.
अशात आता शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले,“पक्षात सर्व ठीक आहे. आणि यापुढेही सर्व चांगलं होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचं आहे आणि ते आपण स्वीकारलं आहे, असं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे”, असं शिवकुमार म्हणाले.
दरम्यान, शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफरही देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. तसेच काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना पर्यायाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. या अंतर्गत सिद्धरामय्या यांना पहिली दोन वर्षे आणि नंतर शिवकुमार यांना पुढील तीन वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे, परंतु ही ऑफर दोघांनाही मान्य नव्हती.