पारनेत, टाकळी ढोकेश्वर -दीड महिने पारनेर तालुक्यातील मुक्कामानंतर निवारा गृहातील शेतमजूर त्यांच्या मूळ गावी परत निघाले तेव्हा पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी स्वत: बस चालवून त्यांना निरोप दिला. यावेळी हे शेतमजूर भावूक झाले. तसेच आमदार लंके यांना उद्याच्या काळात मंत्री होणार, असे आशीर्वाद द्यायला विसरले नाहीत.
देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील मजूर काम नसल्याने पारनेर तालुक्यातून गोंदिया, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नांदेड येथील आपल्या मूळ गावी पायी परतत होते. प्रशासनाने त्यांना सुपा, निघोज, जवळा, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळसह इतर ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवले होते. या काळात चहा, नाश्ता, जेवणाची आ. नीलेश लंके प्रतिष्ठान व त्या-त्या गावांतील दानशूर व्यक्तींनी सोय केली होती. पायात चप्पल नसल्याने त्यांना चपलाही देण्यात आल्या होत्या.
तब्बल दीड महिन्यानंतर केंद्र व राज्य सरकारने सर्व मजुरांना त्यांच्या गावी जाण्याचे आदेश दिल्याने आपल्या घराकडे जाण्याची त्यांची ओढ वाढली होती. आमदार लंके यांच्या प्रयत्नाबरोबर सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी अधिकारी, नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पारनेर बस स्थानकावर निरोप दिला. यावेळी बसद्वारे 162 मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. यावेळी आमदार लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पारनेर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुमावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, कामगार तलाठी स्वप्नील गोरे यांच्यासह वरिष्ठ पातळीवरील अनेक अधिकारी, कर्मचारी, नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना पुढील सुरक्षित प्रवासाला शुभेच्छा दिल्या. तालुक्याचा पाहुणचार पाहून आपापल्या घरी जाणाऱ्या मजूर बांधवांना अश्रू अनावर झाले.
निर्भया माता-पित्यासह गावाकडे रवाना ..!
लॉकडाऊनमध्ये निवारागृहात जन्म झालेली निर्भया पहिल्यांदा आई-वडिलांसह गावाकडे चालली होती. या मातेची प्रसूती करून आरोग्य सेविकांनी त्यांना मोठा आधार दिला होता. यावेळी आपल्या गावी जाताना या मातेस गहिवरून आले.