पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) निकालाची प्रक्रिया आता सात महिन्यांनी सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक “ओएमआर’ शीट मॅन्युअली तपासण्याचे नियोजनही करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.
“टीईटी’ परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी 2 लाख 54 हजार 428 उमेदवारांची नोंदणी झाली होती. यात 2 लाख 16 हजार 604 उमेदवार परीक्षाला उपस्थित होते. पेपर क्रमांक 2 साठी 2 लाख 14 हजार 251 उमेदवारांची नोंदणी झाली होती. यातील 1 लाख 85 हजार 439 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते तर 28 हजार 812 अनुपस्थित होते. परीक्षेसाठी एकूण 4 लाख 68 हजार 679 उमेदवारांची नोंदणी झाली होती. यातील 4 लाख 2 हजार 43 उमेदवार परीक्षेला बसले होते. तर 66 हजार 636 उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले होते.
मोठ्या आर्थिक उलाढाली करुन जानेवारी 2020 मध्ये झालेल्या “टीईटी’ परीक्षेच्या निकालात फेरफार करुन अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. यातील यादीत सुमारे 7 हजार 880 उमेदवारांचा समावेश होता. या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण विभागाला भ्रष्ट कारभाराचा कलंक लागला. यामुळे परिषदेचे कामकाज ठप्प होते.