बिबवेवाडी : प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या “राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल’ने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील उच्च शिक्षणाविषयी ध्येय निर्माण व्हावे व उंच भरारी घेण्यासाठी 700 विद्यार्थ्यांचा “पासपोर्ट’ काढण्यात येणार आहे.
देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि कॉंग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल’मधील विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याचा उपक्रम मंगळवार (दि.14) ते गुरुवार (दि. 16) पर्यंत होणार आहे. इयत्ता सातवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे पासपोर्ट काढले जाणार आहेत. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विशेष म्हणजे पासपोर्ट कार्यालयच तीन दिवस शाळेत येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
आबा बागुल म्हणाले, “पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची उमेद वाढावी या हेतूने या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. भविष्यात परदेशातील शिक्षण असो किंवा शैक्षणिक सहल यासाठी हा पासपोर्ट महत्त्वाचा ठरणार असला तरी उच्च शिक्षण, करिअर आणि भविष्य यावर विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण व्हावेत, त्यानुसार ध्येयनिर्मिती व्हावी हा मुख्य उद्देश आहे.’
तसेच शाळेला अमेरिकेच्या कॉनसुलेट ऑफिसने भेट देऊन विद्यार्थी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत राजीव गांधी स्कूलचे विद्यार्थी अमेरिकेला शैक्षणिक हेतूने नेण्यासाठी निमंत्रण दिले असून, लवकरच अमेरिकेचा दौरादेखील विद्यार्थी करतील, असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.