प्रशांत शिंदे
जर तुम्ही तुमच्या पाल्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉपचा शोध घेत असाल तर ‘क्रोमबुक’ हा पर्याय तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच आला असेल. परंतु क्रोमबुक म्हणजे नेमकं काय? आणि क्रोमबुक हे ऑनलाईन शिक्षणासाठी उपयोगी ठरू शकतं का? हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील तर आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही येथे देणार आहोत…
क्रोमबुक म्हणजे नेमकं काय?
क्रोमबुक हा एक नव्या प्रकारचा कॉम्प्युटर आहे. ज्याप्रकारे बाजारामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज व ऍपल मॅक या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणारे कॉम्प्युटर / लॅपटॉप मिळतात, त्याच प्रकारे क्रोमबुक हा गुगलच्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असल्याने त्याला क्रोमबुक असं म्हंटलं जातं.
क्रोमबुक हे इतर लॅपटॉप पेक्षा स्वस्त कसं?
तुम्ही जर क्रोमबुकच्या किंमती ऑनलाईन तपासल्या तर ते इतर लॅपटॉप पेक्षा बरेच स्वस्त असल्याचं तुम्हाला दिसेल. याचं मूळ कारण म्हणजे क्रोमबुक हे गुगलच्या क्रोम नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत. व गुगलने आपल्या धोरणामध्ये क्रोमबुकची किंमत परवडण्याजोगी असावी अशी अट क्रोमबुक निर्मात्या कंपन्यांना घातली असल्यानं त्याची किंमत कमी असल्याचं गुगल सांगत.
कमी किंमत असल्याने क्रोमबुकमध्ये कमी फीचर्स मिळतात का?
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लॅपटॉप नक्की कोणत्या उपयोगासाठी घ्यायचा आहे? यामध्ये दडलंय. जर तुम्हाला मुलांच्या ऑनलाईन क्लासेससाठी, वर्ड, पीडीएफ डॉक्युमेंट वाचण्यासाठी व एडिट करण्यासाठी, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी, विविध वेबसाईट ब्राऊज करण्यासाठी लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर क्रोमबुक हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. मात्र तुम्हाला हेवी सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी (ऍडोब प्रीमियर प्रो ई.) लॅपटॉप हवा असेल तर क्रोमबुक हा पर्याय तुमच्यासाठी नाही.
क्रोमबुकमध्ये कोणकोणते ऍप्स चालतात?
क्रोमबुक हे गुगलच्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असल्याने याच्यावर गुगल प्ले-स्टोअरवर असलेली बहुतांश ऍप्स चालतात. यामध्ये तुम्ही गेम्स देखील इन्स्टॉल करू शकता. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेले गुगल क्लासरूम, पीडीएफ व्ह्यूवर, मायक्रोसॉफ्ट वर्ड, व्हिडीओ एडिटिंगसाठी काईन मास्टर ही ऍप्स देखील तुम्ही क्रोमबुकवर चालवू शकतील.
मेमरी, रॅम, प्रोसेसर?
बहुतांश क्रोमबुक हे ३२ अथवा ६४ जीबी ऑनबोर्ड मेमरी पर्यायासह उपलब्ध आहेत. लॅपटॉप साईझच्या उपकरणासाठी ही मेमरी अर्थातच तोकडी पडेल यात शंका नाही. मात्र क्रोमबुसोबत तुम्हाला एक्स्ट्रा मेमरीकार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रश्न सुटू शकतो. क्रोमबुकमध्ये देण्यात आलेले रॅम व प्रोसेसर देखील फारच आऊटडेटेड वाटतात, मात्र या किमतीमध्ये ते मार्केटमधील एक उत्तम पर्याय आहेत.
नामांकित कंपन्यांचे क्रोमबुक उपलब्ध
बाजारामध्ये सध्या डेल, एचपी, आसूस या आघाडीच्या लॅपटॉप निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे क्रोमबुक उपलब्ध आहेत. सध्या क्रोमबुक खरेदीसाठी १८ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात.
क्रोमबुक घ्यावे की नाही?
तर ओव्हरऑल सांगायचं झाल्यास तुम्ही जर तुमच्या पाल्याच्या ऑनलाईन एज्युकेशनसाठी एक अफोर्डेबल लॅपटॉप घेण्याच्या विचारात असाल तर क्रोमबुक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र तुमचा वापर अधिक असेल (हेवी युसेज) तर तुम्ही इतर पर्याय शोधण्यास हरकत नाही.