नवी दिल्ली – तेलंगणमधील रामप्पा मंदिराला युनेस्कोकडून जागतिक वारस्याचा दर्जा देण्यात आला आहे. हे मंदिर तेलंगणमधील वारंगळ येथील पालमपेट येथे आहे. या मंदिराला युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहित आज सांस्कृतिक मंत्रालयाने दिली.
रामप्पा मंदिर हा 13 व्या शतकातील वास्तुकलेचे उत्कृष्ठ नमुना आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी या मंदिराचा एकमेव प्रस्ताव होता. म्हणून सरकारच्यावतीने 2019 मध्ये या मंदिराबाबतचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला होता.
युनेस्कोने काकटीय रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तेलंगणाच्या जनतेचे अभिनंदन. विलक्षण रामप्पा मंदिर हे महान काकटीय राजवंशाच्या साम्राज्यातील अजोड कलाकारीचा नमुना आहे. या विलक्षण मंदिर परिसराला भेट देऊन त्याच्या महानतेचा स्वतः अनुभव घ्यावा असे आवाहन मी आपणा सर्वांना करत आहे. असे पंतप्रधान युनेस्कोच्या ट्वीट्सवर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
रामप्पा मंदिराला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले असल्याचे सांगताना आपल्याला खूप आनंद होत आहे. या मंदिराला हा दर्जा प्राप्त होण्यासाठी पंतप्रधानांन केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आपण ऋणी आहोत, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.