Advisory for Rahul Gandhi – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. त्यात राहुल यांनी बोलताना सावध राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेली काही वक्तव्ये आणि त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व त्याला देण्यात आलेले उत्तर या सगळ्याशी संबंधित तथ्यांचा विचार करून भविष्यात अधिक काळजीपूर्वक वक्तव्ये करण्याचा सल्ला आयोगाने राहुल यांना दिला आहे. अलिकडच्या काळात राहुल यांनी मोदींच्या संदर्भात पनौती आणि आणखी काही आक्षेपार्ह शब्द वापरले होते.
त्यावरून भारतीय जनता पार्टीने आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. यासंदर्भात २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोगाने राहुल यांना नोटीसही पाठवली होती. त्याला राहुल यांच्याकडून उत्तर आल्यानंतर त्यांना पुढचा सल्ला देण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे डिसेंबर महिन्यात स्टार प्रचारकांच्या आणि नेत्यांच्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या संदर्भात जी ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे त्याचेही योग्य पालन करण्याचे राहुल यांना सांगण्यात आले आहे.