नवी दिल्ली : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या ३९व्या स्थापना दिनानिमित्त लिहलेल्या ब्लॉगवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पित्रोदा यांच्या मते अडवाणींनी आपल्या ब्लॉगद्वारे नमूद केलीली त्यांची भूमिका देशामध्ये सध्या सुरु असलेल्या राजकीय वातावरणास चपराक आहे.
अडवाणींच्या ब्लॉगमधील दोन प्रमुख मुद्दयांच्या आधारे सॅम पित्रोदांनी अडवाणींच्या ब्लॉगचे सध्याच्या राजकीय वातावरणामधील महत्व स्पष्ट केले असून ते म्हणतात, “अडवाणींच्या ब्लॉगद्वारे दोन गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. पहिली म्हणजे, प्रथम देश – नंतर पक्ष आणि शेवट आपण मात्र सध्याचं राजकीय चित्र पाहिल्यास मोदी याचा विपर्यास करताना दिसत आहेत. मोदी हे सर्वाधिक महत्व स्वतःला देताना दिसत आहेत. अडवाणींच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आलेली दुसरी गोष्ट म्हणजे, ते म्हणतात आमच्या विचारांशी विसंगती असणारे देशद्रोही नाहीत. मी अडवाणींच्या या विचारांचे स्वागत करतो.”
यावेळी बोलताना पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्यामध्ये साम्य असल्याचे देखील सांगितले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. भारतात मोदी सांगतात की, भारताला पाकिस्तान आणि मुस्लिमांकडून धोका आहे तर तिकडे ट्रम्प सांगतात की अमेरिकेला मेक्सिकन तसेच स्थलांतरितांकडून धोका आहे. मोदी सांगतात काँग्रेसला काही कळत नाही तर ट्रम्प म्हणतात डेमोक्रॅट्स पक्षाला काही कळत नाही. ट्रंम्प म्हणतात क्लिंटन भ्रष्टाचारी आहेत तर मोदी म्हणतात राहुल गांधी भ्रष्टाचारी आहेत.”