प्रभात वृत्तसेवा,पुणे, दि. 28 – दिशा परिवार चॉरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. दरम्यान, सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करणाऱ्या व्यक्तींचाही ट्रस्टमार्फत यंदापासून सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी “दिशा परिवार आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी प्रख्यात वकील ऍड. प्रताप परदेशी आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.
दिशा परिवार चॉरिटेबल ट्रस्टने गेल्या 15 वर्षांत राज्यातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या माध्यमातून जवळपास 4500 जणांना लाभ मिळाला आहे. त्यातील अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, प्राध्यापक तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत.
अनेक विद्यार्थी परदेशांत लौकिक कमावत आहेत. या उपक्रमासोबतच ट्रस्टतर्फे यंदापासून कर्तृत्ववान आणि दातृत्ववान व्यक्तींनाही सन्मानित केले जाणार आहे. यासाठी प्रामुख्याने ज्या व्यक्ती सामाजिक जाणिवेतून समाजाला मदत करत आहेत, अशा व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दि. 1 ऑगस्ट रोजी हा सन्मान सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मतीचिन्ह आणि रोख 11 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अशी माहिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिली आहे.